श्री गणेशा



भगवद्गीता!

अथांग सागर आहे, पण तसा समजायला सहज सोपा! याची अनुभूती संपूर्ण सागर बघून जेवढी येते, तेवढीच त्या समुद्राच्या एका थेंबानेही येते. इथे एक एक श्लोक विश्वाला मार्गदर्शन करणारा एक तेजस्वी किरण आहे!


अध्यात्म हा माझा अत्यंत आवडीचा विषय! त्यात भगवद्गीता हा अधिक! त्यामुळे याविषयी काहीतरी लिहावं ही मनोइच्छा आधीपासून होती. आज श्री गणेशा करत आहे इतकेच! आजवर गीतेवर बरेच जण निरूपण करून गेलेत, अजूनही करत आहेत. परंतु हे निरूपण नक्कीच नाही, तर मला जी उमजलेली आहे, समजलेली आहे त्याची एक उजळणी मात्र आहे. खरतर गीता वाचल्यावर ‘मी’, ‘माझे’ म्हणणे योग्य नाही हे खरे आहे. परंतु हा स्व-पणाचा नकार अनुभवण्याचा आहे; भौतिक व्यवहाराचा नक्कीच नाही. गीता हा वेदांच्या प्रमाणेच, निःसंशय, ज्याला ना आदी ना अंत असा एक सनातन वैदिक धर्म ग्रंथ आहे. अर्थात त्यामुळे सदर ग्रंथ अमुक एका काळात लागू होत नाही असा कुठला काळच नाही. तो भूत - भविष्य - वर्तमान सर्वकालीन आणि सर्वव्यापी आहे.


आपल्या वैदिक धर्मात, मुख्यत्वे करून वेद, उपनिषद, पुराण, इतिहास आणि स्मृती असे अनेक ग्रंथप्रकार आहेत. यातले मूळ धर्मग्रंथ वेद आणि त्यांचे सार म्हणजेच अर्जुन-कृष्ण संवाद असलेली भगवद्गीता!, कारण वेद अन गीता हे दोन्ही स्वतः प्रत्यक्ष ईश्वराने सांगितलेले आहेत. उपनिषद हे वेदांचेच निरूपण आहे. पुराण ग्रंथ हे कर्मकांड, रामायण व महाभारत हे इतिहास-ग्रंथ आहेत. काही ज्ञानी ऋषींनी शिष्यांच्या सोबत केलेल्या संवादाचे संकलन म्हणजे स्मृती आहेत. जसे की मनूस्मृती आणि पराशर स्मृती इत्यादी. अजून पुढे जोडायचे तर, संतांचे चरित्र आणि त्यांनी रचलेले साहित्य! हे संत साहित्य म्हणजे गीतेत सांगितलेल्या कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग यांचे एक मिश्रण आहे असे म्हणायला हरकत नाही. आजकाल या संत साहित्याला समाजसेवा, सामाजिक ग्रंथ वगैरे ठरवायचा घाट काहींनी घातलेला आहे खरा, परंतु सुजाण लोक सत्य काय ते नक्कीच जाणतात! त्यामुळे अधिक बोलणे आवश्यक नाही.


आपल्या वैदिक ग्रंथांच्याबद्दल बोलायचे झाले तर, हे ग्रंथ कधीही कायद्या प्रमाणे किंवा इतर धार्मिक ग्रंथांच्या प्रमाणे शब्दशः तोलून बघता येत नाहीत. इथे आशय महत्वाचा! त्यामुळे एक श्लोक पकडून संपूर्ण ग्रंथाची समजूत करून घेता येत नाही. माझ्यामते बरेच लोक आपल्या ग्रंथांच्या बाबतीत, गीते बाबतीत हीच गल्लत करतात. आणि याचीच परिणीती म्हणून की काय, ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या श्लोकाच्या पुढे बहुतांश लोकांची गीता जात नाही.


आपल्या धर्मग्रंथांचे वैशिष्ठ्य म्हणजे, बहुतांश सर्व ग्रंथ आणि स्मृती हे प्रामाणिक संवाद आणि प्रश्नोत्तर स्वरूपात आहेत. इथे कुठेही हुकूम किंवा जबरदस्ती नाही. तार्किक शंकेला तार्किक उत्तर आहे. मुद्द्याला गुद्द्याने उत्तर नाही. म्हणूनच इतका उदारमतवादी माझा धर्म आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.

  

आपल्या धर्मात एक नव्हे तर शेकडो संतमंडळी होऊन गेली. आजकाल संत किंवा सद्गुरू असे शब्द कोणीही उठसुठ लावून घेतो. गुरू परंपरा हा देखील आपल्या धर्माचा एक कणा आहे. ज्या महापुरुषाला स्वतःला ईश्वराप्रत जाण्याचा मार्ग माहिती आहे, फक्त माहिती नाही तर त्याची अनुभूती देखील आहे आणि जो त्यामार्गावर इतरांना देखील घेऊन जाऊ शकतो तोच खरा संत किंवा सद्गुरू म्हणता येईल. कारण ज्याला स्वतःला कोणतीही ब्रह्म म्हणजेच ईश्वर अनुभूती नाही, तो इतरांना कसा बरे मार्ग दाखवू शकेल? म्हणूनच कोणत्याही व्यक्ती पुरुषाला सद्गुरू बोलण्यापूर्वी आपण दहा वेळा तरी विचार करणे आवश्यक आहे. एखादा व्यक्ती चमत्कार करतो, म्हणजे तो साधू-संत असतो हा चुकीचा समज आहे. चमत्कार आणि ईश्वर अनुभूती या दोन्ही अत्यंत भिन्न बाबी आहेत. खरे संत तेंव्हाच चमत्कार करतात जेंव्हा प्रकृती स्वतः त्यांना आव्हान देते. उठसुठ चमत्कार करणारा निव्वळ एखादा तांत्रिक किंवा ढोंगी बाबा असतो. त्यामुळे एखादा स्वतःला सद्गुरू म्हणवून घेणारा उद्या भोंदू बाबा निघाला तर तो त्याचा एकट्याचा दोष नसून तो आपलाही आहे याची जाणीव असावी. कारण गुरुचीही परीक्षा बघणारा आपला धर्म आहे. उदाहरणच सांगायचे तर ‘स्वामी विवेकानंद’.


काही लोक म्हणतात ईश्वर आहे तर आम्हाला दाखवा. पण मुळात ही मागणीच किती छद्मी आहे बघा! एक उदाहरण बघू, एखादा मुलगा शाळेत बक्षीस मिळवतो. तेंव्हा त्याला काय व किती आनंद झाला हे त्याच वर्गातील इतर मुलांना अजिबातच कळणार नाही. फारतर इतर मुले तो आनंदी आहे एवढंच बघू शकतील. पण त्याला झालेली जाणीव मात्र इतर कोणीही अनुभवू शकणार नाही. मग तो बक्षिसी मिळवलेला मुलगा कोणी विचारले तर समजावून सांगेल की कसा व किती आनंद झाला. काहींना तो, त्याने काय केले जेणेकरून त्याला ते बक्षीस मिळाले, ते देखील सांगेल. पुढे त्यावर विश्वास ठेऊन जी मुले त्याच खरोखरच अनुसरण करतील ते देखील अशी बक्षिसी मिळवतील. अर्थात, ईश्वर प्राप्ती ही अनुभवण्याची गोष्ट आहे. दाखवा म्हटल्यावर दाखवण्याची नाही. त्यासाठी काही कष्ट घ्यावे लागतील. आणि ते कसे घ्यायचे ते वेद, गीता, संतमंडळी यांनी सांगून ठेवलेलं आहे. याच संतांनी जी स्वतः अनुभूती घेतली, त्यावर विश्वास ठेवून आपण मार्गक्रमण करणे, हे आपल्या हातात आहे. जसे की एखाद्या वैज्ञानिकाने शोध लावला तर आपण त्यावर विश्वास ठेवतो, पण आपल्याला विश्वास नसेल तर त्याने काय नक्की प्रणाली केली आहे, ती स्वतः आपण केल्या शिवाय तुम्हाला त्याला खोटे पाडता येत नसते. अगदी तसेच इथेही आहे.  


गीता संवाद हे स्वयं ब्रह्म आहे. कारण कोणी प्रेषित, दूत वगैरे नव्हे तर प्रत्यक्ष भगवान नारायण अर्जुनाशी संवाद साधत आहेत. वेदांच्या नंतर हा एकमेव ग्रंथ असा आहे जिथे कोणीही मध्यस्थ नाही. अठरा अध्यायात नटलेला हा संवाद, खचितच अंतिम ध्येय सांगणारा आहे.


परंतु या सर्व गोष्टी मध्ये भगवंत किंवा आपण ज्याला ईश्वर म्हणतो तो कोण? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. कोणत्याही वस्तू, भावना किंवा जगातील कुठलीही गोष्ट जी व्यक्त असो वा अव्यक्त, ती तिच्या गुणांनी ओळखली जाते. आणि ईश्वर हा त्यापरे म्हणजेच त्रिगुणातीत (सत्व, रज, तम) आहे. अर्थात या गुणांच्या पलीकडे एकच आहे तो म्हणजे ‘असणे’ पणाचा गुण! कुठलीही गोष्ट, मग ती मानवी कल्पनेतील असो वा कल्पनेच्या बाहेरची, ती असण्यातून प्रकट होते. त्यामुळेच कुठल्याही काळात एखादी गोष्ट नसते असे होत नाही. ती मानवाला किंवा इतर भौतिक बाबींना जाणवते तेंव्हा ती व्यक्त स्वरूपात असते. ज्यावेळी ती अव्यक्त स्वरूपात जाते तेंव्हा ती जाणीव लुप्त होते इतकेच. याचा अर्थ ती गोष्ट नष्ट झाली असे होत नाही, तर तिची जाणीव आपल्याला भासत नाही इतकेच!


पुन्हा मूळ विषयावर येऊ. अर्जुन द्विधा मनस्थितीत (आपल्याच आप्त स्वकीयांशी कसे लढायचे) असताना त्याला त्याचा सत्य मार्ग दाखवणारा हा श्रीकृष्ण होता. अर्जुनाला दाखवलेला मार्ग हा प्रत्येक मनुष्याला कधीना कधी उपयोगी येणारा आहे. अर्जुनाला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी कृष्णाने, प्रश्नोत्तर स्वरूपात त्याच्याशी संवाद केला आणि शंका निरसन केले. अखेरीस सर्व ज्ञान अर्जुनाला दिल्यानंतर, कृष्ण अर्जुनाला म्हणतो ‘तुला मी सगळं ज्ञान दिलेलं आहे, तेंव्हा तुला जे उचित वाटत आहे ते कर’. थोडक्यात इथे कुठलीही जबरदस्ती नाही हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे.


‘अतिपरिचयात अवज्ञा’ ही उक्ती इथे लागू होत नसली तरी आता थांबून मूळ गीतेतल्या शिकवणीकडे वळावे असे मला वाटते. 


जय श्रीकृष्ण 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्री गणेशा

भगवद्गीता! अथांग सागर आहे, पण तसा समजायला सहज सोपा! याची अनुभूती संपूर्ण सागर बघून जेवढी येते, तेवढीच त्या समुद्राच्या एका थेंबानेही येते. इ...