मराठी विनोदी साहित्याचा पहिला आधारस्तंभ: राम गणेश गडकरी



  मानवाच्या विविध जीवनरसातील एक महत्वाची रसनिष्पत्ती म्हणजे विनोद! अनेक दुःखांच्या डोंगरात विविध छटांनी वाहिलेल्या ह्या हास्यरसाच्या नद्या मानवीय जीवनाला हलका आधार देऊन जातात. यांच्या अस्तित्वाने सुखाची गंगोत्री नक्कीच कुठे तरी सापडेल या आशेवर माणूस तग धरून राहतो. हे रस कधी बैठकांच्या स्वरूपात दिसून येतात, कुठे महाविद्यालयाच्या कट्ट्यावर पाहण्यास मिळतात, तर कधी साध्या साध्या प्रसंगातून यांचे तुषार मनाला मोहरून जातात.


    परंतु भारतात हे रस फक्त जीवन विषयक तत्वाकडेच अडकले होते. त्यांना साहित्यिक ओंजळीची उपासना कोणी दिली नव्हती. त्याची सुरवात काहीश्या प्रमाणात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी केली. मात्र या विनोदरसाची गंगोत्री निर्माण करणारा खरा भगीरथ म्हणजे राम गणेश गडकरी! विनोदी साहित्याचा पहिला आधारस्तंभ! गडकऱ्यांना मराठी भाषेतील ‘शेक्सपियर’ म्हणतात. आणि ते खरेच आहे. या अवलियाने आपल्या समग्र वाङ्मयातून अनेक गड सर करून दिले आणि त्यावर इतरांनी मराठी विनोदी लेखनाचे साम्राज्य उभे केले.

    राम गणेश गडकरी हे नाव आज १०० वर्षांनी देखील स्मरणात आहे. अवघ्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी विपुल लेखन मराठी भाषेला दिले. त्यांच्या लेखणीतून निघालेले प्रत्येक अमृततुल्य शब्द आज सुद्धा त्यांच्या त्यावेळच्या सामाजिक भानाची, जाणिवेची आठवण करून देतात. गडकऱ्यांचा जन्म, २६ मे १८८५ रोजी नवसार, मुंबई प्रांत (आजचा गुजरात) येथे झाला. लवकरच १८९२ ला वडिलांचे निधन झाले व त्यांचे कुटुंब पुण्यात वास्तव्याला आले. शालेय शिक्षण झाल्यावर ते फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेताना किर्लोस्कर नाटक मंडळींच्या नाटकातले आवाज त्यांच्या कानी पडले आणि त्यांचा वावर तिकडेच जास्त वाढू लागला. कमवण्यासाठी ते तिथेच काम करु लागले. जोडीला नाटकांचा अभ्यास चालू केला. वयाच्या १९ व्या वर्षी ज्या व्यक्तीला धड मराठी बोलता येत नव्हते, ती व्यक्ती नरा चा नारायण व्हावा तशी मराठी भाषेच्या पदस्पर्शाने पावन होऊन निघाली. इंग्रजी, संस्कृत इत्यादी भाषेतील पौराणिक, आधुनिक भाषा व नाट्य यांचा सुद्धा अभ्यास त्यांनी केला आणि या सर्व भांडवलावर १९१२ साली प्रेमसंन्यास हे नाटक लिहून पूर्ण झालं! या नाटकाला भाषिक सौंदर्याचा उत्कृष्ठ नमुना असंच म्हणावं लागेल. त्यांचे शिष्य आचार्य अत्रे यांना पण साहित्याची गोडी या नाटकामुळे लागली असे ते म्हणत. राजसंन्यास वाचून तर खुद्द त्यांच्या गुरूंनी, म्हणजे कोल्हटकरांनी तर “मी जर शिक्षण मंत्री असतो तर हे नाटक प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये अभ्यासाला ठेवले असते” असे उद्दगार काढले!

    तशी गडकऱ्यांना १८ नाटके लिहायची होती.पण अवघ्या ९ वर्षात त्यांनी प्रेमसंन्यास, भावबंधन, पुण्यप्रभाव व एकच प्याला ही पूर्ण नाटके तर वेड्यांचा बाजार, गर्वहरण, राजसंन्यास ही तीन अपूर्ण नाटके लिहिली. या जोडीला वाग्वैजयंती नावाचा कविता संग्रह गोविंदाग्रज हे टोपणनाव वापरून लिहला. शिवाय बाळकराम या नावाने इतर स्फुटलेख, कथा हे चालू होतंच. ठकीचे लग्न या कथेने तर त्या काळी हास्य कल्लोळ उडवून दिला होता. पण हे कार्य ही अपूर्णच राहून गेले. लहान मुलांच्या साठी दोन बालनाट्ये आणि काही इसापनीतीच्या कथा प्रसिद्ध केल्या. यांचे विशेष म्हणजे या कथेत एकही जोडाक्षर त्यांनी वापरले नाही! या महर्षीचा मृत्यू वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी, २३ जानेवारी १९१९ रोजी झाला. मराठीला ईश्वराने दिलेला हा हिरा त्यांच्याच अंगी असलेल्या स्वभाव हट्टी गुणाने हिरावून घेतला. माधवराव पेशवे गेल्याने जे मराठा साम्राज्याचे नुकसान झाले तेच मराठी भाषेचे या व्यक्तीच्या अचानक निधनाने झाले. दिलेले दान पुरेसे पडण्याआधीच ईश्वराने आपला हात काढून घेतला होता.

    गडकऱ्यांचे लेखन अनुप्रास अलंकाराने बहुत नटले होते. वाक्यरचनेच्या रुपात त्यांनी विविध नाट्यरंग अगदी भरून काढले होते. “प्रेमात राजा गुलाम होतो, पण दारू पिल्यावर गुलाम देखील राजा सारखा वागू लागतो” हे एकच प्याला नाटकातील अजरामर वाक्य कोण विसरेल? याच नाटकातून त्यांनी उभा केलेला तळीराम हा सर्वसामान्य लोकांच्यात वावरणारा तळीराम आहे, हे नाकारून चालेल का? “मुलीने उंबरठा ओलांडल्या दिवसापासून बापाने दारा बाहेर पडायचे बंद केले आहे” या वाक्यातून विनोदीच पण करुण रसाने भरलेल्या त्या काळच्या बापाची कैफियत त्यांनी प्रेमसंन्यास या नाटकात दाखवली आहे. गडकऱ्यांचा विनोद पूर्णतः निखळ होता. ते जेवढं लिहीत त्या पेक्षा त्यांचं बोलणं जास्त विनोदी होत. प्रेमसंन्यास मधील विसरभोळा गोकुळ तर सगळ्यांच्या तोंडी असेल आजही! आजकाल आपण ज्याला PJ का काय म्हणतो त्याचा उगम देखील गडकऱ्यांनी केलेला आहे असं म्हटलं तरी वावग नाही ठरणार! कारण त्यांनी वेड्यांचा बाजार मधील बळवंत नाटक मंडळीमध्ये काम करणारा देशपांडे नावाचा गृहस्थ अशाच प्रकारच्या PJ नी रंगवलेला आहे. गडकरी हे किर्लोस्कर नाटक मंडळी चे कडवे निष्ठावंत. पुढे काही वादामुळे गंधर्व नाटक मंडळी वेगळी झाली आणि त्यांनी स्वतःची नाटक कंपनी स्थापन केली! पाहिलं नाटक गाजल्यावर बोडस येऊन गडकऱ्यांना चिडवून लगेच म्हणाले, “मास्तर, आमच्या कंपनीचा नारळ फुटला बर का!” गडकरी पण लगेच उत्तरले, “नारळ फुटला आता कंपनी केंव्हा फुटणार?”. असा त्यांचा विनोद होता. उदाहरणे बरीच आहेत. पण गडकरी स्वभावाने फटकळ! पटकन बोलून जायचे त्याचे स्वरूप त्यांच्या ध्यानी नसायचे, विनोद त्यांनी आणला खरा परंतु त्याचा तंत्र शुद्ध अभ्यास मात्र त्यांचे शिष्य आचार्य अत्रे अर्थात प्रल्हाद केशव अत्रे यांनी केला.
(क्रमशः….)

२ टिप्पण्या:

इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्...