मराठी विनोदी साहित्याचा दुसरा आधारस्तंभ: आचार्य अत्रे    दूर वरून जणू ईश्वराने आपल्या हाताने अर्ध्य द्यावे तसे अनेक ओहोळ येतात. डोंगरांच्या अनेक कड्या कपारीतून त्यांचे पाट आपापली वाट शोधत खाली येऊ लागतात. पण ते जो पर्यंत एकत्र येत नाहीत तो पर्यंत नदीचे स्वरूप त्याला प्राप्त होत नाही. आणि ते एकत्र नसले तर तो विधात्याचा डोंगर त्यांना कधी खाऊन टाकतो हे त्यांनाही कळत नाही. विनोदाचे अर्ध्य गडकरी मास्तरांनी सोडले खरे; पण त्याला दिशा दिली नव्हती. जमिनीत रोवलेलं हे रोप सूर्याच्या कोणत्या दिशेने जाईल हे अजून ठरले नव्हते. त्या रोपाला योग्य दिशा द्यायचं काम केलं ते म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी!
    विनोदाचा पुतळा असलेल्या ह्या अवलिया व्यक्तीचा जन्म दिनांक १३ ऑगस्ट १८९८ रोजी सासवड येथे झाला. कलेचा गुण कुठून तरी रक्तात येतो म्हणतात, त्यांची आजी अत्यंत हजरजबाबी होती असे ते सांगत आणि हाच गुण त्यांच्यात उतरला. पुढे शिक्षणासाठी म्हणून ते पुण्यात आले. तिथे राम गणेश गडकरी यांच्या सारख्या प्रतिभावंत आसामिशी त्यांचा संबंध आला. गडकरी तापट स्वभावाचे असून देखील ते त्यांच्या जवळ बसून रहात; अगदी हाकलून देई पर्यंत बसत. गडकरींनी अत्रे यांची साहित्य विषयक आवड बघून त्यांना मार्गदर्शन सुरू केले. सुरवातीला आपले प्रेमसंन्यास हे पंचअंकी नाटक वाचायला दिले. त्यातली प्रतिभा बघून अत्रे अगदी भारावून गेले. पुढे गडकऱ्यांनी त्यांना, ‘घ्या हा मॉलिअर वाचा, हा हाजीराम केजीराम वाचा’ असं सांगून बरेच मार्गदर्शन केले. गडकरी त्यांना घेऊन पुण्यात फिरत. या काळात अत्रेंनी निरीक्षण कला शिकून घेतली आणि मनाच्या देव्हाऱ्यात गडकरींना गुरुस्थानी जागा दिली!
    १९२० पर्यंत गडकरी व बालकवी हे जग सोडून गेले आणि मराठी काव्यविश्व पोरकं होऊन गेलं. अशा वेळी माधव ज्युलियन यांच्या नेतृत्वाखाली सात आठ जण मिळून ‘रविकिरण मंडळ’ची स्थापना झाली. परंतु त्यातील अनेक त्रुटी, पारशी भाषेचा आत्यंतिक प्रभाव ह्या बाबी कुठे तरी तांदळात आढळणाऱ्या खड्या सारख्या लागत होत्या. ह्या खड्यांमुळेच १९२२ रोजी अत्रेंचा झेंडूची फुले हा विडंबन काव्यसंग्रह निर्माण झाला. पुढे चार वर्षांनी १९२५ साली झालेल्या शारदोपासक संमेलनात आग्रहास्तव याचे पहिले जाहीर वाचन झाले आणि प्रेक्षकांच्या हसून हसून मुरकुंड्या वळल्या. याच काळात १९२७ रोजी गडकरी जयंती निमित्त प्र के अत्रे यांचे पहिले जाहीर भाषण झाले आणि एक उत्तम वक्ता मराठीला आंदण म्हणून मिळाला! या भाषणाची सुरवात देखील ‘कालच गडकरी माझ्या स्वप्नात आले होते, त्यांनीच मला तुमचे आभार मानायला सांगितले’ अशी करून पहिल्या वाक्याला टाळी घेतली. पुढे ते लंडनहुन TD ही पदवी घेऊन आले. ज्याचा फायदा त्यांना पुढे नवयुग वाचनमालेत झाला. १९३७ रोजी ते नगरसेवक म्हणून पुणे म न पा मध्ये निवडून गेले व तिथे त्यांची चेअरमन पदी नियुक्ती झाली! ह्याच महापालिकेने त्यांना खूप विनोद शिकवला असे ते म्हणत! इतक्या वर्षात हा वल्ली विडंबन कवी म्हणून नावारूपाला आलेला होता.
    नाटक हा अत्रेंच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. ते स्वतः नाटकी, खट्याळ असल्याने त्यांची नाटके देखील तशीच आहेत. १९३६ साली लिहलेले साष्टांग नमस्कार हे समाजातील वेडं गोळा करून लिहलेले नाटक! या नाटकाने हास्याचे उचांक मोडले. पुढे ब्रह्मचारी, ब्रॅण्डीची बाटली, मोरूची मावशी, भ्रमाचा भोपळा अशी बरीच विनोदी नाटके त्यांनी लिहली. या सोबतच घराबाहेर, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच अशी सामाजिक बांधिलकी जपून त्यातील अन्यायाला वाचा फोडणारी नाटके देखील लिहली. ‘चांगुणा’ ही सगुणा नावाच्या एका अभागी स्त्री वर लिहलेली छोटी कादंबरी! यात थोडाही विनोद नसून पूर्णपणे करुणरसाने ही कादंबरी भरली आहे. अत्र्यांची नाटके ही जनसामान्यांना रुचेल अश्या भाषेत आहेत. त्यात फारशी अलंकारिक भाषा नाही की कुठे दिखावा नाही. साधे लिखाण, बोलकी भाषा यातून सुद्धा मार्मिक विनोद त्यांनी साधलेला आहे. हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
    आचार्य अत्रे हे नाव म्हटलं की त्यांनी जीवनात खेळलेले वाद ओघाने आलेच. अगदी मामा वरेरकर, श्री मा माटे, ना सि फडके यांच्या पासून ते शेवटचा वाद म्हणजे ठाकरे विरुद्ध अत्रे इथपर्यंत त्यांची समयरेखा आहे. या गाजलेल्या वादातुन त्यांना विनोद बुद्धीने अजेय ठरवले. आणि त्या विनोदी भाषेमुळेच ते हास्यसाम्राट झाले. एकदा १९४४ साली धुळे जिल्ह्यात मराठी साहित्य संमेलन भरवले होते. मामा वरेरकर त्याचे अध्यक्ष होते. आणि त्या संमेलनाच्या कमिटी मध्ये अंदाधुंद कारभार माजला होता. आचार्य अत्र्यांना निमंत्रण दिले गेले नाही. परंतु अचानक एका साप्ताहिकातून अस्सल धुळेकर या नावाने लेख येऊ लागले आणि त्या संमेलनापेक्षा लोकांचे त्या लेखन मालिकेकडेच जास्ती लक्ष गेले. ह्या अस्सल धुळेकराने त्या संमेलनाची इत्यंभूत माहिती फोडायला आणि झोडायला सुरवात केली. त्यात जोडीला विनोदाची फोडणी देखील दिली होती. हा अस्सल धुळेकर दुसरा तिसरा कोणी नसून आचार्य अत्रे होते! त्या वर्षीचे ते संमेलन पुण्यात बसून अत्र्यांनी गाजवले.
    १९४० साली आचार्य अत्रेंनी नवयुग वाचनमाला काढली आणि शैक्षणिक अभ्यासक्रम कसा असावा याची रेकॉर्ड ब्रेक नोंद केली. आजवर असा अभ्यासक्रम कोणालाही जमलेला नाही! अभ्यास सोप्पा करण्याच्या नादात त्यातलं वाङ्मय विसरता कामा नये या उक्तीवर त्यांनी भर दिला. पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाल्यावर जनतेच्या पाठिंब्याने ‘मराठा’ हे दैनंदिन वृत्तपत्र सुरू केले. आज देखील लोक संयुक्त महाराष्ट्र झाला तो अत्रे यांच्या घणाघाती भाषणांमुळे असे म्हणतात. आयुष्याच्या उत्तर काळात कर्हेचे पाणी या नावाने पाच खंडांचे आत्मचरित्र लिहले. आयुष्यात जगलेल्या अनेक खेळींचे प्रहार या आत्मचरित्रात उमटलेले आहेत. जगातली प्रत्येक गोष्ट आपणास यायला हवी ह्या विचारांचा हा माणूस! जेवढा अंगाने धिप्पाड तितकाच मनाने मोठा! माफी देण्याचे वस्त्र तर ते डोक्याला बांधूनच हिंडत! जीवनमार्गात मांडलेल्या पटांचा खेळ हसत हसत खेळून तो अगदी मुक्त उपभोगला! त्यात कधी हार आली कधी जित! पण तिकडे त्यांचं लक्षच नव्हतं! विनोदाची लहर मात्र सारखी अंगातून विजेसारखी भिने! असाच एक खेळ १३ जून १९६९ रोजी नियतीने त्यांच्याशी खेळला! हा शेवटचाच खेळ! ते हरले! आणि सतत हसवणारा हा बाबुराव अत्रे संबंध महाराष्ट्राला रडवून गेला!
    सूर्य आणि त्याच्या किरणांचा जितका दृढसंबंध तितकाच संबंध अत्रे आणि त्यांची भाषणे यांचा करता येईल; कारण ती किरणे विरोधी पक्षाला पोळून काढत; अगदी नामोहरम करीत! तर इकडे श्रोत्यांना प्रकाशाचे दान पण देत. हे दान पण अगदी निखळ असे! कारण यातून हास्याचा खळखळाट ऐकू येई. भाषण करण्याची ढब अत्र्यांच्या कडून बऱ्याच मोठमोठ्या लोकांनी उचलली. पण अत्र्यांनी त्याचा अभ्यास केला होता. थोरामोठ्यांची भाषणे त्यांनी ऐकली होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर कसे मुद्देसूद बोलतात, गडकरी कसे विनोद करतात, अच्युतराव कोल्हटकर कसे खिळवून ठेवतात, लोकमान्य टिळक कसे बघतात, त्यांचा प्रभाव वाणीतुन कसा प्रकट होतो, या सर्वांचा अभ्यास केल्यावर ही भाषणाची लकब त्यांना आत्मसात झाली होती. भाषण करताना लागणाऱ्या प्रसंगावधान, अभ्यास, विनोदबुद्धी, आत्मविश्वास या सर्व गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या होत्या. विनोदाचे तंत्र त्यांनी विकसित केले, जितकं बोलायचं तितकंच बोलून काही इंचच टाळी घेण्याची कला त्यांच्या कडे होती. असेच एकदा अत्र्यांचा सत्कार होत असताना त्यांच्या बद्दल एक वक्ता बोलला की अत्र्यांचा विनोद खूप छान आहे वगैरे पण ते सगळ्यांची बिन पाण्याची करतात. लगेच मागे खुर्चीवर बसलेले अत्रे उठून बोलले, “अस नाही बर का, कधी कधी मी पाणी वापरतो”. अत्रेंनी विनोद करताना जास्ती अलंकार वापरले नाहीत कारण ‘जो मराठी बोलतो, तो मराठी माणूस’ इतक्या साध्या विचारांचा हा माणूस! त्यामुळे सर्वसामान्य माणसाला त्यांचे विनोद कळत. लेखन करताना विडंबन आणि अतिशयोक्ती यांचा भरपूर वापर केला. त्यांचे नाट्यलेखन विनोद प्रहसना मुळे गाजले. पण त्यापेक्षा त्यांनी वाद आणि भाषणे जास्ती गाजवली. अत्रेंचा विनोद चांगला होताच पण तो खट्याळ जास्ती होता, रोजच्या जीवनातील बोलले जाणारे व्यंग त्यात होते. साहित्यिक मुलामा पेक्षा साध्या दगड विटांनी तो उभारला होता. या इमारतीला सजवण्याचे, रंगवण्याचे काम केले ते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी!

(क्रमशः….)
    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्...