मनोगत

मनोगत....

       आजपासून मी माझा वैयक्तिक ब्लॉग सुरू करत आहे. वास्तविक ब्लॉग ला प्रस्तावना लिहावी की नाही ह्यावर थोडा संभ्रमित होतो. परंतु मसुदा कोणताच पक्का नाही आणि त्यावर पूर्वग्रहित संरचना धरून प्रस्तावना लिहणे मनाला कुठेतरी पटत नव्हतेच. म्हणून सरळ मनोगत लिहावे ह्या विचारावर मी येऊन थांबलो.

       खरंतर बऱ्याच दिवसांपासून काही मित्र, आप्त स्वकीय मी ब्लॉग लिहावा असे सुचवले होते. पण स्वतःची अपूर्णता व मनाची तितकी तयारी नसल्याने ते मी करायला तयार नव्हतो. एकदा घडी बसली की मग श्रीगणेशा करावा ह्या विचारात ब्लॉग लिहण्याचा विचार मी सोडून दिलेला होता. मात्र गेल्या तीन चार महिन्यापासून हातातील लेखणीचा कागदाला काही तरी उपयोग व्हावा अस सारखं वाटत होतं! त्यातून काही सुचलेले शब्द सोशल मीडियावर पडत होते, काहींनी ते उचलून देखील धरले. पण या सगळ्यात हातातील मोरपिसाची तहान भागेना, आणि त्याची भूक म्हणून हा ब्लॉग नावारूपाला येत आहे!

       'रिकामटेकडेपणाचे उद्योग' हे नाव मला राम गणेश गडकऱ्यांच्या 'रिकामटेकडेपणाची कामगिरी' यावरून सुचलं. साहित्यात त्यांचे स्थान माझ्याकरिता अत्यंत आदराचे आहे. अनुप्रासा ने नटलेले त्यांचे भाषिक सौंदर्य माझ्या मनाला खूप भावलेले आहे. विनोदात अत्रे, पु ल देशपांडे ह्या वल्ली अजरामर आहेत. काव्य क्षेत्रात ग्रेस माझे आवडते, तरीही माडगूळकर, बोरकर, पाडगावकर यांना मनात विशेष स्थान आहे. या सर्वांनी दिलेले भांडवल जे थोडेबहुत माझ्या अंगवळचणीला पडले आहे त्यातून ह्या उद्योगांचे पाढे मला सुचत आहेत.

       ह्या ब्लॉग मध्ये माझे विचार, सुचलेल्या कथा, कविता, सांगावे वाटणारे शब्द व लेख, काही अनुभव आदी गोष्टी मी मांडणार आहे, ते समाधानासाठी! यातून कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाला अहितकारक बोलण्याचा उद्देश आजिबात नाही. वाचकांनी यांतील बाबींवर अभिप्राय कळवावेत एवढी एकच माफक अपेक्षा ठेऊन मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की माझ्या ह्या लेखणीला कधी पूर्णविराम न मिळो!

आपला विनम्र,
अनय सखदेव 

२ टिप्पण्या:

इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्...