मराठी विनोदी साहित्याचा तिसरा आधारस्तंभ: पु ल देशपांडे




    दगड आणला, छिन्नीचे घाव घातले म्हणून मूर्ती पूर्ण होत नाही. नक्षीकामाची कल्पकता त्यामागे असावी लागते. ही कल्पकता त्या मूर्तीला संगमरवरी शलाकेचा साज आणून देते. वरवर कोरलेल्या नक्षीकामाचे साक्षीदार चांगले आतवर जाऊन त्यात प्राण आल्याची साक्ष देतात. तीच साक्ष मराठी जनतेने पु ल देशपांडेंच्या अभिवादनाला दिली. ‘शब्दांनी शब्दांचे केले वर्णन तरीही अर्थ उरे काही!’ तसा इतके लिहून, इतके बोलून अजून ‘दशांगुळे उरला’ अस पुलंच्या बाबतीत म्हणावं लागेल. मराठी विनोदाला साहित्यिक, कलात्मक, अलंकारिक रूप सजवलं ते पुलंनी! कदाचित सरस्वतीनेच आपला एखादा दूत पाठवला असेल!

    ह्या दूताचा पहिला पदस्पर्श दिनांक ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मराठी मातीला झाला, आणि त्या मातीला एक परिहासाचे नवचैतन्य मिळाले. सरस्वतीने जणू पैलू पाडलेला हिराच जन्माला घातला होता. या पैलूंचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला पुढील ऐंशी वर्षे हसवणार होते! पुलंचे लहानपण मुंबईत गेले. तिथेच दत्तोपंत राजोपाध्ये यांच्या कडे गायन आणि हार्मोनियम वादन शिकून घेतले. वयाच्या चौदाव्या वर्षीच बालगंधर्वांच्या समोर पेटी वाजवून त्यांची थाप पाठीवर मिळवली होती. लहानपणीच एकदा कुठेसे अत्रेंचे भाषण ऐकले आणि ते त्यांचे चाहते झाले. पुढे शिक्षणात M.A. व LLB ह्या पदव्या संपादन केल्या.

    १९४७ साली कुबेर नावाच्या एका मराठी चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहली. हे पहिले काम! नन्तर त्यांना बरेच चित्रपट मिळत गेले. काही चित्रपटात काम देखील केले. १९५३ चा गुळाचा गणपती हा शेवटचा! हा चित्रपट खूप गाजला! हा चित्रपट सबकुछ पुलं असा होता. कारण कथा, पटकथा, नायक, संगीत, दिग्दर्शन सगळं काही पुलंनी केलं होतं. या दरम्यान बरेचसे अनुभव त्यांनी मिळवले. बेळगावला महाविद्यालयात प्राध्यापकी करत तेथील रावसाहेब त्यांनी अनुभवले. असे बरेच अनुभव त्यांनी जतन केले. एक होता विदूषक (१९९२) हा पुलंनी पटकथा लिहलेला शेवटचा चित्रपट! पण पुलं घराघरात पोचले ते गुळाचा गणपती गाजल्या मुळे!

    प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात काहीतरी एक निर्णायक टप्पा असतोच. ‘बटाट्याची चाळ’ व त्याचे प्रयोग हा असाच एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा! खूप वर्षांपासून चाळीतले अनुभव पुलंनी लिहून ठेवले होते. अधून मधून महाविद्यालयात त्याचे मोघम वाचन देखील झाले होते. मात्र त्याचा पहिला एकपात्री प्रयोग मुंबईत झाला आणि रातोरात त्यांना प्रसिद्धी मिळाली. या एकपात्री प्रयोगाने तो कसा असावा याची एक मिसाल घालून दिली. आजही त्या प्रयोगाची आठवण काढली जाते. परंतु त्याचे फक्त ५० प्रयोग केले गेले. यानन्तर वाऱ्यावरची वरात, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा अशी बरीच नाटके झाली. सर्वांना प्रसिद्धी मिळाली. पुन्हा असा मी आसामी ने उच्चांक मोडला. असा मी आसामी ची वाक्ये आजही अनेक तरुणांच्या तोंडी आढळतील.

    १९६५ साली ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. या जोडीला इतर उद्योग चालू होतेच. जिथे संगीताची बैठक होणार आहे तिथे ते आपली बैठक घेऊन जात. गाण्याबद्दल प्रचंड आस्था होती. एका मुलाखतीत सुद्धा साहित्या पेक्षा संगीताबद्दलची आस्था त्यांनी बोलून दाखवली आहे. कविता ऐकण्याचा व वाचण्याचा या व्यक्तीला खूप छंद. कुठेही प्रवासाला निघाले की सुनीता देशपांडे व पु ल यांच्यामध्ये कवितांच्या भेंड्या रंगत. त्या आवडत्या कवितेप्रमाणेच पु लं ची भाषा पण काव्यमय होती.

    पु लं सर्वश्रुत आहेत ते त्यांच्या कथाकथना साठी! व्यक्ती आणि वल्ली प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातले ललित खूप गाजले. यात पुलंनी बोलून दाखवलेली पात्रे खरोखरच दुनियेत कुठेतरी असावीत अस वाटतं. या पात्रांचा प्रपंच त्यांच्याच तोंडून ऐकताना तो एक वेगळाच परिहास असल्याची जाणीव होते. हसवणूक, गोळाबेरीज, खोगीरभरती, पुरचुंडी अशी बरीच पुस्तके निघाली. रावसाहेब हे खरोखर होतेच ते त्यांनी तसेच लेखणीतून जिवंत ठेवले. पण अंतू बरवा, सखाराम गटणे, हरितात्या, नारायण ह्या समाजात वावरणाऱ्या मूर्त प्रस्थांना त्यांनी खरोखरीच जिवंत केले! पाळीव प्राणी-पक्षी, बिगरी ते मॅट्रिक वगैरे कथानकातून विनोदाबरोबरच सामाजिक जाणिव घडवून दिली.

    पुलंची प्रतिभा किती होती ह्याची मोजदाद कदाचीत कोणीच नाही करू शकणार. साक्षात सरस्वती वीज बनून संचार करते की काय अस ते लिखाण! परिहासविजल्पित आणि काव्यमय लिखाण! वाक्यावाक्यातून गद्य लिहिताना त्यात विणलेली पद्य शैली दिसून येईल. यांचा सुंदर मिलाफ क्वचित कोणाला जमेल. विनोदी उपमा देण्याची कला, वाक्यात देखील यमक जुळवलेली प्रक्रिया! त्यातुन निर्माण होणारा सौंदर्यविलास हे सारंच भारावून टाकणारं! बटाट्याच्या चाळीतील एक प्रसंग आहे. भ्रमण मंडळ नुकत बोरिबंदर स्टेशन वर पोहोचतं तेंव्हा पु ल वर्णन करतात- ‘व्हिकटोरिया थांबल्या थांबल्या दसऱ्याला सोनं लुटावं तस हमालानी सामान बाहेर काढायला सुरवात केली. त्या गडबडीत काशीनाथ नाडकर्णीचा तो पेटारा एका हमालाने खेचला. त्याचा धक्का त्रिलोकेकरच्या हातात असलेल्या टिफिनला लागला. आणि सकाळी बाबली बाईंनी करून दिलेला गोडी बटाटीचा रस्सा जरासा त्रिलोकेकरांच्या पॅन्टवर आणि बराचसा बाबूकाका खरेंच्या धोतरावर सांडला. तेवढ्यात दुसऱ्या एका हमालाने तो खेचला आणि उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, व तो पुलाव खाऊन बोरिबंदरचा रस्ता अगदी तृप्त झाला.’ हे इतकं बहारदार वर्णन दुसरं कोण करू शकेल? त्यांचा विनोद स्थितीपेक्षा वाक्यरचनेतुन जास्त फुलून दिसे. शब्दांची ठेवण अशी असायची की फिदीफिदी हसण्यापेक्षा स्मितहास्याची गर्दी अधिक जमे! पुलंचे विनोद मन हसवणारे होते. ते हास्य अधिककाळ रुजवून ठेवण्याची ताकद त्या विनोदाच्या मध्ये होती. त्यांचा विनोद तात्पुरता नव्हता. तो मनात घर करून बसे. मग पुढे त्याच विनोदाची आठवण येऊन मन उल्हासित होऊन जाते. शब्दांची किमया दाखवणारी कोणती तरी जादू त्यांच्याकडे असावी. प्रत्येक ठिकाणी अवस्थेप्रमाणे त्या भाषेचा रंगही बदले. ‘पानवाला’ आणि ‘नारायण’ यातली भाषा दोन्हीकडे भिन्न आहे. ‘पानवाला’ मधील विनोद त्यातल्या पानाप्रमाणेच रासनिष्पंन आणि अगम्य होऊन रंगतो. तर नारायण मध्ये त्यातील संवादशैली आणि स्थितीच्या अवस्थेतून फुलणारा परिहास बेरंगी पाण्याच्या खळखळाटाप्रमाणे रंगणारा! त्यांच्या लेखणीचे मूळ संस्कार तेच ठेऊन साहित्याचा रंग तेवढा वेगळा देण्याची त्यांची सचोटी इतर कोणी नाकारू नाही शकणार. निरनिराळ्या स्थिती वर्णन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी पात्रे निर्माण केली. त्यानुसार भाषाशैली मध्ये बदल ठेवले. काही ठिकाणी रंग एकच पण त्यांच्या छटा वेगळ्या! त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भाषा व त्यातली समृद्धी वेगळी वाटे. पुलंचे लिखाण अगदी विनोदापुरतच मर्यादित होत अस नाही पण बाकी त्यांनी घेतलेल्या मुलाखती, इतर प्रवास वर्णने, लेख, कविता यात देखील त्यांचं एक निराळं रूप बघायला मिळत. पण विनोद हे मुख्य साधन! अफाट निरीक्षणशक्ती, भरपूर वाचन आणि प्रचंड लाभलेली स्मरणशक्ती ह्या तिजोरीतुन ही विनोदाची मूर्ती उभी राहिली. त्या मूर्तीच्या हातून घडलेलं व्यक्ती आणि वल्लीच साम्राज्य आज अनेक लोकांच मनोरंजन करत आहे, दुःख हलकं करत आहे. देवाने ह्या वल्लीचे जरी प्राण नेले असले तरी त्यांनी उभ्या केलेल्या वल्लींचे प्राण हरपणे त्याला नाही जमणार! मूर्तिकार गेला तरी मूर्तीच्या रुपात तो आपलं जीवन सौंदर्य मागे सोडूनच जातो!

(संपुर्ण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्...