नेहमीप्रमाणे ती नदीकाठावर बसली होती. तिचा लहानपणीचा मित्र किशोर आज भेटायला आला होता. अनेक वर्षांच्या आठवणी संवादात ढवळून निघत होत्या. अचानक त्या आठवणीने ती शून्यात निघून गेली. त्या घडून गेलेल्या घटनेमुळे तिचे आजवर लग्न जमले नव्हते. मनाने फार खंगली होती. सर्व बाजुंनी फक्त नकार! अंधार!!
किशोर तिची समजूत घालत होता. शेवटी त्रागा करून ती त्याला म्हणाली, “मग, तू करशील लग्न?” तिच्या त्या वाक्याने तो एकदम गडबडून गेला. थोड्यावेळाच्या शांततेनन्तर निघून गेला. दिवसाच्या दावणीला सूर्य हिसडे देत होता. पण तिच्या हुंदक्यांनी तो देखील थोडासा स्तंभित झाला. कदाचित आजचा दिवस वेगळा असावा!
वयाच्या चौदाव्या वर्षी गावातल्या चार नराधमांनी तिच्या पाकळ्या तोडल्या होत्या. त्याच्या जखमा आजही अस्तित्व टिकवून होत्या. किंबहुना समाजाने त्यांना मिटू दिले नव्हते. ते फुल उमलण्याआधीच कोमेजले होते. लोक मात्र ‘हीच ती मुलगी’ असा अविर्भाव घेऊन वावरत होते. घरच्यांचा बांध रोज फुटे! वडील तर तेंव्हाच हृदयविकार होऊन गेलेले! आईची जीवनज्योत कोनाड्यातल्या देवापुढे प्रार्थनेच्या तेलाने सदैव तेवत होती.
किशोरच्या मनात नानाविध विचार चालले होते. त्याची श्रीमंती लग्नासाठी दुसऱ्या श्रीमंतीच्या शोधात होती. पण त्याच्या मनात हलकल्लोळ माजलेला! तिने विचारलेला प्रश्न त्याला विचाराधीन करून गेला होता. ‘अश्या किती मुली असतील? घटनेपुरती न्युज होते. गुन्हेगारांना शिक्षा झाली. सरकारने मदत दिली. पुढे काय?’ तो स्तब्ध होता. चंद्र मात्र आज खिडकीतून प्रकाशत होता. आज त्याने दिशा बदलली असावी!
सायंकाळी उशिरा पोस्टमन येऊन पत्र टाकून गेला. आश्चर्याने तिने ते पत्र हाती घेतले. किशोरचे होते. पत्र उघडून आतला मजकूर तिने वाचला. डोळ्यांनी ते पत्र चिंब भिजवून काढले. पत्रात त्याने लग्नाला होकार कळवला होता! ती धावत आईकडे गेली. कदाचित इथून पुढे ती फक्त धावणारच होती…!
समाप्त
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा