न भेटणाऱ्या आठवणी



पर्वताच्या कड्यावरून जरी उडी ठोकली तरी झुरळाला मरण भेटत नाही. आठवणी तशाच असाव्यात सतत वळवळ करणाऱ्या, आणि ...कधी न मरणाऱ्या! जाणीव देतात पण छे! भेटत नाहीत!! नियतीचा हाच खेळ असावा. हवे ते फासे पडत नाहीत आणि जेंव्हा पडतात तेंव्हा चाल खेळायला डाव हातातून गेलेला असतो. मग ना फासे कामाचे ना खेळ. डाव खेळता खेळता नियती आपला डाव साधत असते. असो नियतीला उत्तर नाही.
काहीश्या जंजाळातून सावरत थोडं शांत बसावयास मन डोळे झाकून पहुडतं अन मग उगाच एक माशी कानाशी येते आठवण घेऊन! घोंगावत राहते. ना जाते ना पकडीस येते! हं!! आपण पण तिला उगाच पकडण्याचा प्रयत्न करत बसतो ना, अशक्य गोष्ट करत! आणि तरी यदाकदाचित ती पकडीस आलीच तर ती मेलेली निघते! उगा मग त्याच मेलेल्या मड्यास कुरवाळत बसतो. साध्य काहीही होणार नाही माहीत असून सुद्धा! कदाचित!!
माहितीय हा डाव आहे, पण फासे फेकत राहावे लागेल कसल्यातरी आशेवर; कधीतरी आपला डाव लागेल या जीवावर!
ह्याच आशेत जळताना कधीतरी मग झोप लागते. पण काही आठवणी तिथेही पाठ सोडत नाहीत. जळू सारख्या चिकटून बसतात. मग स्वप्नात गोष्टी घडत जातात. तिथेही फासे उलटे पडले की फार आश्चर्य वाटत नाही. हे उधळण केलेले घोडे आहेत त्यांना ना वेसण आहे ना मर्यादा. म्हणूनच नेहमी मर्यादा ते ओलांडत जात असावेत. एखादा फारच पुढे जातो भावनेच्या भरात इतका की त्याला स्वप्नांची कवाडं सुद्धा दूर सारू वाटतात. त्याला लगाम लावण्यात अर्धी रात जाते. पण तो लगाम सुद्धा तितकाच असतो. तात्पुरता व मर्यादित! 
नजरबंदीच्या आड कुठेतर त्याचा उपाय आहे म्हणतात. पण आजवर त्याला कोणी पाहिले नाही. योग्य वेळी योग्य फासा पडल्यावर दिसेल कदाचित. किंवा तो फासाच जिंकून देईल एखादा डाव! नको!! पुन्हा दुसरा डाव खेळायचा आहे! इच्छा नसताना सुद्धा आणि मग तोही जिंकावा लागेल! हरलो तर?! छे! नको ती कल्पना...! समुद्राच्या मातीत उगाच रेघोट्या ओढत बसण्यात काय ठेवलंय! नेहमी एक लाट येऊन रेखालेल्या कथेला निराळाच आकार देत असते! अगदी तिला हवा तसा! मग लाटेतच एकरूप व्हावं का?! नाही, नको!! ही तर शरणागत होईल. त्यापेक्षा थोपवू तिला! मित्र म्हणतो नियतीला का कोणी अडवू शकतो? खरंच आहे त्याचे म्हणणे. आणि पटतंय आता! पण तरीही अजून बरीच रेखाटने बाकी आहेत, बरेच डाव बाकी आहेत, पण फासे मात्र जरासंधाचे आहेत..! उलटे पडणारे!!
आजची रात्र वेगळी आहे कदाचित, कुठेही रात किडे नाहीत. क्षणभंगुरता तर मुळीच नाही. उद्याचा डाव कोणता असेल काय ठाऊक? परंतु जुने डाव अजूनही डोळ्यासमोर तुऱ्या देत आहेत! जमतील तश्या जखमा देऊन पसार होत आहेत..!
हा आठव मत्कृर आहे! फारच!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्...