Album Hitterrrs...सप्टेंबरच्या एक तारखेला जेंव्हा मला कोरोना झाला तेंव्हा एक महिना पूर्ण विश्रांती घ्यावी लागणार होती. थोडक्यात कसलीही दगदग होता कामा नये. आणि यावेळेत करावं काय? हा यक्ष प्रश्न होता. कशात लक्ष न लागणे, अस्वस्थता वाटणे वगैरे नेहमीची कोविडची लक्षणे होतीच. आणि मग शेवटी संगीत आवडतं! म्हणून त्यात लक्ष गुंतवलं गेलं. शास्त्रीय संगीत तर नेहमीच पाचवीला पुजून होतं. मग दुसरं काहीतरी ऐकावं म्हणून मग विचार चालू होता. खरंतर मला बॉलीवूड मधील संगीत सुवर्णकाळ म्हणजेच १९५० ते १९७५ असा साधारण काळ; ती गाणी अगदी लहानपणापासूनच आवडत, अगदी म्हणजे साधारण चार एक वर्षांचा असताना आराधनाची कॅसेट मी घरच्यांना सारखी रिवाइंड करायला लावून ऐकायचो. पण साधारण १९८० नंतरची गाणी कधी आवडलीच नाहीत, किंबहुना भावली नाहीत, म्हणूनच आवडलीही नाहीत. तशी ऐकली खूप! नवी-जुनी अगदी रेहमानची सुद्धा! पण नाही! का? माहीत नाही!!

जुनी गाणी ऐकायचा छंद! पण कधी त्याचा संगीतकार कोण? शैली काय? इतपत कधी गेलो नव्हतो. तसे तत्कालीन नौशाद, एस डी बर्मन, आर डी बर्मन, शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, खय्याम, रवी, ओ पी नय्यर वगैरे नावे पक्की ठाऊक होती. पण ओ पी म्हणजे घोड्यांच्या टापांचा आवाज, आर डी/बप्पी लहरी म्हणजे पॉप-डिस्को यापलीकडे फारसे कधी लक्ष गेले नाही. मध्यंतरी लॉकडाउन काळात राजकपूरची गाणी; म्हणजे, त्याच्या चित्रपटातील जुनी गाणी ऐकली. नेहमीसारखी ती पण आवडती होतीच. पण तेंव्हा त्या गाण्यांबद्दल थोडं एक वेगळ्याच प्रकारचे औत्सुक्य निर्माण झालेल होतं. काहीतरी वेगळेपण नक्कीच जाणवत होतं. पुढे सांगलीत परत आल्यानंतर तो उत्साह मावळला होता; जो कोरोना लागण झाल्यावर परत डोके वर काढू लागला होता. आणि त्याच पहिल्या आठवड्यात सुरवातीच काम केलं की या गीतांचा संगीतकार कोण?

शंकर-जयकिशन! शंकर जयकिशन अस या संगीतकारच नाव होतं. खर तर ही जोडगोळी आहे, पण एकच आहे! पुढे औत्सुक्य इतकं ताणल गेलं की मिळेल ती माहिती गोळा करायला सुरुवात केली. आणि पुढील वीस एक दिवस डोक्यात फक्त तोच विषय होता. एक वेगळीच जादू असलेला संगीतकार. जादूच! हे मी नाही मुघल ए आजम, बैजू बावरा सारख्या चित्रपटाचे संगीतकार नौशाद सहाब म्हणून गेलेत, 'They are not musicians, They are magicians'. खरतर या फंदात पडण्यापूर्वी माझ्याभोवती फक्त आर डी बर्मनच एक वर्तुळ होत. एक वेगळा संगीतकार, आधुनिक, Innovative, वगैरे आणि वगैरे! पण हे सगळं वर्तुळ त्या वीस दिवसात पार उधळून गेलं. आपल्यासाठी सत्य तोवरच सत्य असतं जोवर पडद्याआडच्या बऱ्याच गोष्टी बाहेर येत नाहीत. शंकर सिंग रघुवंशी आणि जयकिशन दयाभाई पांचाळ ही अशीच पडद्याआडील दोन नावे होती.

बरसात (१९४९) ते गोरी (१९९२) पर्यंतची १७० चित्रपटांची कारकीर्द पण खऱ्या अर्थाने १९७१ पर्यंतच म्हणजे जयकिशन हयात असे पर्यंतच धरावी लागेल कारण हे दोघे मिळून एक अधिक एक फक्त अकरा नाही तर एकशे अकरा होते. राज कपूर व पृथ्वीराज कपूरनी हे हिरे हेरले तरी त्यांना संधी आग (१९४८) चे संगीतकार राम गांगुली पृथ्वी थिएटर सोडून गेल्यावर बरसात (१९४९) मध्ये मिळाली. आणि तो जिंदगीतला पहिलाच अल्बम ब्लॉकबस्टर अल्बम ठरला. याच चित्रपटातील 'जिया बेकरार है' या गाण्यानेच तर लता मंगेशकर खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आल्या. पुढे आवारा (१९५१) मधील यशाने रातोरात दोघे सुपरस्टार झाले. हो सुपरस्टारच! इतकी प्रसिद्धी कधीच कोणत्या संगीतकाराला मिळाली नसेल. एक तर किस्सा ऐकला आहे, एका बड्या पार्टीत राज-दिलीप-देव हे तिघे आले होते पण जशी जयकिशनची इम्पाला कॉरिडॉर मध्ये आली तेंव्हा सगळा जत्था तिकडे वळला होता. पण आवारा नन्तर इतर दिग्दर्शक व निर्मात्यांसाठी पण काम करायला सुरुवात केली. ती घोडदौड चालूच राहिली. फिल्मफेअर सुरू झाले १९५४ साली! आणि १९५४ ते १९७२ या दरम्यान अठरा वर्षात नऊ फिल्मफेअर पटकवणे आजवर इतक्या कमी कालावधीत कोणाला जमलेलं नाही. चित्रपटातील नायक नायिकेपेक्षा जास्त मानधन घेणारे पण हे एकमेव. साधारण १९५६ नन्तर एखादा दिग्दर्शक "आम्ही या चित्रपटात संगीत द्यायला तयार आहोत" एवढं लिहून शंकर-जयकिशनची सही केलेली चिट्ठी जरी घेऊन गेला तर अगदी कोणताही निर्माता डोळे झाकून नायक-नायिका कोण आहे हे सुद्धा न बघता वाट्टेल तेवढा पैसा ओतायला तयार असायचा. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी NSC चे सर्टिफिकेट लोकांनी खरेदी करावेत म्हणून जो हे सर्टिफिकेट घेईल त्याला शंकर जयकिशन यांच्या कार्यक्रमाचे फुकट तिकीट मिळेल म्हणून ऑफर काढली होती. नव नवीन प्रघात पाडणे, नावीन्य आणणे, हा तर हातखंडा होता. एक बरसात मधील 'जिया बेकरार है' हे गाणं ते अंदाज मधील 'जिंदगी एक सफर है सुहाना' हे गाणं या वीस वर्षांत त्यांनी कुठून कुठे चित्रपट संगीत नेऊन ठेवलं होतं हे दिसेल. संगीतकार म्हणून तसे यशाच्या उच्च शिखरावर फार काळ राहिलेले तसे फक्त तीनच १)शंकर जयकिशन २) लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि ३) ए आर रेहमान. यातील लक्ष्मीकांत प्यारेलाल तर स्वतःहून म्हणत की ते शंकर जयकिशन यांचीच शैली वापरतात. पण जयकिशनचा अकाली वयाच्या फक्त एकेचाळीसाव्या वर्षी मृत्यू झाला नसता तर कदाचित ही जोडी अजून पुढे गेली असती. पाश्चात्य, अरेबियन आणि हिंदुस्तानी शास्त्रीय या सर्वांचा सुरेख मेळ त्यांना जमत होता. ड्रम, पियानो, तबला, डफली, accordion, violin आणि गिटार ही आवडती वाद्ये. 

शैली बद्दल बोलायच तर एकदा एका गाण्याला दिलेला रिदम, ठेका, चाल, ठेवण पुन्हा तशीच दुसऱ्या गाण्यात दिसणार नाही. मोठया ऑर्केस्ट्राचा वापर करणे ही सुरवात सुद्धा याच जोडगोळीने  केली. आवारा मधील 'घर आया मेरा परदेसी' हे ड्रीम सॉंग आणि जीस जिस देश में गंगा बहती है मधील 'आ अब लौट चले' ही उत्तम उदाहरणे आहेत. आ अब लौट चले या गाण्याला सर्वात जास्त म्हणजे १२० violin, ४० quairs एकावेळी वाजत होते. काही म्युझिशीअन्सना स्टुडिओच्या बाहेर बसावे लागले होते, गाणं व्यवस्थित व्हावं म्हणून रात्री रेकॉर्डिंग केलं. पण जिथे आवश्यक नाही तिथे इतका ऑर्केस्ट्रा अजिबात वापरत नसत. काही sad सॉंग्स साठी वगैरे. एक वैशिष्ट्य म्हणजे गाण्याचा फ्लो, अगदी म्हणजे prelude नंतर मुखडा मग interlude व कडवं मग postlude हे सगळं एका धाग्यात विणल्या सारखं! prelude, interlude वगैरे चालू असताना फोकस फक्त रिदमवर असे पण तेच बोल सुरू झाले की फोकस शब्दांवर व सुरांवर! असे आवाजात चढ उतार अगदी परफेक्ट होत. त्यात तो जमाना सिंगल ट्रॅक रेकॉर्डिंगचा होता. prelude कुठूनतरी ठिकाणाहून सुरू होऊन ते फिरत, गिरकी घेत घेत बरोबर त्या चालीवर आणणे हे नक्कीच सोपं काम नाही याचं उत्तम उदाहरण सांगायचं तर लाट सहाब मधील 'जाने मेरा दिल किसे ढूंढ रहा है' हे सांगावं लागेल. कुठूनतरी एका किंकाळीच्या आवाजातून तो prelude चालू होतो व फिरत फिरत तो बरोबर मुखड्याकडे येतो व अत्यंत चपखलपणे तिथे स्थिरावतो हे खरोखरच दिपून टाकणारं आहे. Interlude बद्दल सांगायच तर बदन पे सितारे हे गाणं काय कमी आहे? आजसुद्धा हे गाणं तितकंच ताज वाटतं. आणि 'जान पहचान हो' या गाण्याच्या रिदमनेच धमाल उडवून दिली की ते परदेशात अजूनही फेमस आहे. परदेशस्थ लोकांना त्यांच्या चित्रपटात एखादा हिंदी/भारतीयपणा दाखवायचा असेल तर 'आवारा हु', 'मेरा जुता है जपानी' आणि 'जान पहचान हो' या तीन पैकी एक गाणं बॅकग्राऊंड ला ठेवतातच, अगदी आजही! पुढे जेंव्हा यांची फी परवडणारी नसायची किंवा जयकिशनच्या मृत्यूनंतर निर्माते इतर संगीतकरांच्या समोर 'शंकर जयकिशन जैसा म्युझिक दो' म्हणून आपली डिमांड ठेवायचे.

मूलतः शैलेंद्र व हसरत हे दोघे गीतकार ठरलेले होते आणि या दोघांचा वाटा पण महत्वाचा आहे. कारण गीत हिट व्हायला नुसतं संगीत नाही तर संगीतावर लिहिलेले शब्द देखील वजनदार असले पाहिजेत. कारण बहुतांशी आधी चाल तयार व्हायची नंतर मग त्या चालीवर गीत लिहिलं जायचं हे काम सुद्धा सोपं नाही. पण मुळात अस करायचं कारण की संगीतकार शब्दांच्या चौकटीतुन बाहेर पडतो. त्यामुळे शंकर जयकिशनच्या संगीतात बरीच विविधता आहे. दोन गीतकारांच्या सोबतच दोन सहाय्यक दत्ताराम व सेबास्टियन हे दोघे पण महत्वाचे आहेत. कारण arrangement सांभाळणे हे महत्वाचे काम या दोघांचे असे. साधारण रिदम दत्ताराम सांभाळी तर सेबास्टियन सूर विभाग. हे दोघेही शंकर जयकिशनचा डावा आणि उजवा हात होते यात कोणतीही शंका नाही.

इतक्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी फक्त १७० चित्रपट केले. पण त्याला काही कारणे आहेत एक त्यांचं मानधन, इतर संगीतकरांच्या मानाने मानधन प्रचंड होतं. काही चित्रपटांत चित्रपटातील नायक/नायिकेपेक्षा जास्त किंबहुना दुप्पट मानधन घेतलेलं आहे. बऱ्याच निर्मात्यांना ही गोष्ट परवडण्याजोगी नव्हती मग ते इतर संगीतकारांकडे वळत. दुसरं एक वेळ, दोघांच्या कडे वेळ कमी, शेवटी त्यांनी कामं वाटून घेतली तरी पण वेळ अपुरा पडे. त्याला सुद्धा एक कारण होतं एखादं गीत असलं तर त्याच संगीत आपल्या म्युझिक arrangers ना अगदी अथ पासून इति पर्यंत विस्कटून सांगत. म्हणजे अगदी तबल्यावर किती कमी अथवा जास्त थापा पडाव्यात इतपत. बहुतांश संगीतकार ते arrangers वर सोडून देत काही मूळ वाद्ये कशी वाजवी एवढंच सांगत तस इथं नव्हतं, अगदी त्या रेकॉर्डिंग मध्ये वाजणारं साध्यातल साधं वाद्य कस वाजाव हे सुद्धाठरवले जाई. दोघांमधील जयकिशनजींची एक खासियत होती, ती म्हणजे टायमिंग! चित्रपटाला दिल जाणार बॅकग्राऊंड म्युझिक एकवार सीन बघून हाताच्या बोटांवर मोजून नोटेशन लिहून द्यायचे. आणि ते म्युझिक तिथं चपखल बसायचं. तस दोघांच्यात तुलना करणेच चुकीचे आहे. दोघेही आपापल्या जागी शंकर व जयकिशन दोन्हीही होते. कोणती चाल कोणी लावली हे दोघेही सीक्रेट ठेवत आणि तितकेच इतर लोकांना ते जाणून घेण्याची उत्सुकता! कायम संगीताबद्दल नवनवीन अभ्यास चालू असे. त्यामुळेच एखादी चाल सुचली आणि त्यांना आवडली तर ठणकावून सांगत की हे गाणं गाजणार म्हणजे गाजणार! 'है ना बोलो बोलो' हे अंदाज (१९७१) मधील गाणं. सिप्पी बंधूंना शंकरजींनी असंच ठणकावून सांगितले होते की हे गाणं ब्लॉकबस्टर होईल जर नाही झालं तर संगीत सोडून देईन. इतका आत्मविश्वास फक्त तेच दाखवू जाणे! सांगेल तितकं थोडं आहे!

एक चित्रपट असला तर त्यातलं एखादं गाणं कोणीही हिट करेल. दोन हिट केली म्हणजे वाह वाह! पण इथे ही जोडी संपूर्ण अल्बम हिट करत होती. एवढ्या चित्रपटांत बहुतांशी चित्रपट संपूर्ण अल्बम हिट झालेले आहेत. यातलेच काही मला जास्ती आवडलेले अल्बम आणि त्याची माहिती मला सांगायची आहे..!


क्रमशः...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्...