लताजी किंवा लता दीदी नव्हे, मला लता असंच म्हणायचं आहे. कलाकाराला अरे तुरे बोलल्याशिवाय तो आपला वाटत नाही. खरंतर हा प्रपंच मला आधीच करायचा होता. पण निमित्त असं लताच्या जाण्यातून मिळेल याची कल्पना नव्हती. मला तुझी सर्वात आवडती गायिका कोण अस विचारलं तर इतरांच्या प्रमाणेच लता हेच नाव तोंडी येईल. यात फार अप्रूप ते काय? पण मला लता तिच्या फक्त आणि फक्त निव्वळ आवाजासाठी नाही आवडत यात मला अप्रूप आहे आणि मला त्याचाच विस्तार करायचा आहे. आणि अर्थात त्यासाठीच हा लेखप्रपंच!
सांगीतिक प्रवास भलेही १९४२ पासून झाला असेल पण लता प्रकाश झोतात आली ती 'आयेगा आनेवाला' आणि 'जिया बेकारार है' या गाण्यापासून वास्तविक ही गाणी लताच एक साधं रूप दाखवणारी आहेत. अर्थात एक नाट्यसंगीत, रागधारी एवढा मुलाहिजा घेऊन एक मराठमोळी मुलगी एवढीच या गाण्यात दिसेल. अगदी इतर सर्वसामान्य तत्कालीन गायिकांच्या प्रमाणे; परंतु त्यानंतर हळूहळू ज्या पद्धतीने ही मुलगी प्रगत होत गेली त्याची आस मला आहे. आणि ही गायिका देखील अश्या ठिकाणी पोहोचली की तिथे ध्रुवाचे स्थान सुद्धा हलले असेल.
त्यामुळे साधारण बैजू बावरा (१९५२) च्या आधी आणि बैजू बावरा नंतर हा फरक ठळक जाणवेल. नूरजहाँ या गायिकेच्या शैलीत सुरवातीला गाणाऱ्या लताने आपली हळूहळू एक अशी शैली निर्माण केली की पुढे हजारो गायिकाच काय पण अगदी सामान्य व्यक्ती देखील लताच्या आवाजात, तिच्या शैलीत आपल्याला जमत का? असा एखादा प्रयत्न नक्कीच करून बघतो. लताने आपले उर्दू, हिंदी उच्चार व्यवस्थित व्हावेत म्हणून मेहमूद नावाच्या एका मौलाना कडून उर्दू शिकून घेतले.
बरसात (१९४९) या चित्रपटातील सर्व गाणी शंकर जयकिशन यांनी लता कडून गाऊन घेतली आणि एक अमर युगाची सुरवात झाली. आवारा(१९५१) मध्ये एक गाणं रेकॉर्ड होणार होत 'घर आया मेरा परदेसी'. कितीही केलं तरी गाणं हवं तसं होईना शेवटी काही लोक घरी परतले, रात्री बारा वाजता एक ढोलकी वादक मिळाला आणि त्या सोबत गाण्याचे सूर देखील जुळले, गाणं लवकर रेकॉर्ड करून घ्यावं म्हणून पहाटे तीन वाजता लता ला बोलावलं स्वतः जयकिशन जाऊन घेऊन आले लता सुद्धा कोणतेही आढेवेढे न घेता आली आणि पहाटे सहा वाजेपर्यंत गाणं रेकॉर्ड झालं आणि हिट सुद्धा! ही आर्तता कदाचित कुठे पाहायला मिळेल.
'रसिक बलमा' हे गाणं खरंतर Song of the Century अस म्हणावं लागेल. चोरी चोरी या चित्रपटातील हे गाणं ऐकताना त्यातील प्रत्येक पदर लताने ज्या तर्हेने गायले आहेत ते भलेभले मार खातील. म्हणूनच एकदा बडे गुलाम अली खां 'कम्बख़्त ये कभी बेसुरी होती ही नहीं।' असे उद्दगार काढले होते. रसिक बलमा या गाण्याला उंच पिच होता आणि ते संपूर्ण गाणं तसंच गायचं होतं. आणि संगीतकार जयकिशन यांना देखील हे गाणं फक्त लता साठीच आहे याची खात्री होती आणि त्यांनी ते करूनही घेतलं. वयाच्या पाचव्या वर्षी मा. दीनानाथ मंगेशकरांच्या शिष्याला त्याची चूक दाखवून तो पुरीया धनश्री त्याच्याचसमोर चूक दुरुस्त करून गाऊन दाखवून, आपल्याला एवरेस्ट ठेंगणा आहे हेच दाखवून दिले.
प्रतिभा ही साधनेतून उपजत असलेल्या गुणांना सजवून येत असते. यासाठी एकच किस्सा पुरेसा आहे. कुठेतरी संगीत कार्यक्रम होता, ऑर्केस्ट्रा, सेट अप सगळ काही तयार....लता स्टेज वर उभी राहते prelude सुरू होतो... मुखडा सुरू होतो तोच अचानक ती थांबते आणि मागे वळूनही न पाहता म्हणते,
चार नंबर का तबला; ताल ठीक किजीए।
बस्स, प्रतिभा ती काय असावी....
.......भाग १.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा